Breaking News

                              ऑईल इंजीनसाठी रॉकेल आणायचे कोठून?
गडचिरोली : समाज कल्याण व कृषी विभागामार्फत दरवर्षी सबसिडीवर शेतकर्‍यांना ऑईल इंजीनचा पुरवठा केला जातो. हे ऑईल इंजीन ग्रामीण भागात शेतकरी रॉकेलच्या माध्यमातून चालवितात. परंतु शेतकर्‍यांना यासाठी रॉकेल उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची प्रचंड अडचण होत आहे. सरकार ऑईल इंजीन पुरविताना रॉकेलसाठीची व्यवस्था गावनिहाय का करून देत नाही, असा सवाल चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी परिसरातील शेकडो शेतकर्‍यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांनाही निवेदन पाठविले असून शेतकर्‍याच्या या प्रश्नाची सोडवणूक सरकारी यंत्रणेने करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १९८0 च्या वनकायद्यामुळे अनेक सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत पडून आहे. चिचडोह बॅरेज वगळता नवीन सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकर्‍याला पावसाच्या भरवशावर शेती करावी लागते. काही शेतकरी गावालगतच्या नदी व तलावावरून पाण्याचा उपसा ऑईल इंजीनमार्फत करतात. त्यामुळे दरवर्षी कृषी व सामाजिक न्याय विभाग ऑईल इंजीन पुरवठय़ासाठी लाखो रूपयाच्या निधीची तरतूद करते. हे ऑईल इंजीन डिझेलवर चालवावे, अशी सरकारी यंत्रणांची भूमिका आहे. मात्र गावात सहजपणे डिझेल मिळत नाही. त्यामुळे केरोसीनचा वापर आर्थिकदृष्ट्याही परवडणारा असल्याने शेतकरी करतात. परंतु आता केरोसीन पुरवठय़ावरही बंधन आणले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना केरोसीन मिळत नाही. त्यामुळे शेतीओलीताच्या कामावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शासनानेच ऑईल इंजीनधारक शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र केरोसीनचा कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. 

Post a Comment

0 Comments