एटापल्ली :एटापल्ली येथे लवकरच नगर पंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत महाजनसंपर्क अभियान कार्यक्रम घेण्यात आला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या बैठकीत नगर पंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचे निमित्त साधून स्थानिक गोटूलमध्ये सदस्य नोंदणी महाअभियान राबविण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, भाजपा महामंत्री बाबुराव कोहळे, नंदू काबरा, पं. स. सभापती दिलीप कुलसंगे, बाबुराव गंपावार, दीपक सोनटक्के, आसेन्ना मेडीवार, प्रशांत आत्राम आदी उपस्थित होते. यावेळी एटापल्ली शहरात जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना केले. एटापल्ली नगर पंचायतीची निवडणूक लढण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही एटापल्ली येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नगर पंचायतीची निवडणूक स्वबळावर व पूर्णताकदीनिशी लढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, दत्तू राजकोंडावार, आशा अतकमवार, प्रशांत कोकुलवार, विनोद पत्तीवार, विजय अतकमवार, संदीप जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर पंचायतीची निवडणूक अगदी जवळ आली असून प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. स्वबळावर लढण्याबरोबरच एकहाती सत्ता मिळविण्यासाठी १७ पैकी किमान ९ जागा निवडून आणण्यासाठी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने स्वत:ला झोकून दिले पाहिजे, असे आवाहन सुरेश पोरेड्डीवार यांनी केले. दोन पक्षाच्या बैठकीमुळे एटापल्लीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
<< Back to Headlines Next >>
![]() |
0 Comments