नगर पंचायत : दोन टप्प्यात २६ व ३0 नोव्हेंबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक
गडचिरोली : निवडणूक विभागाने नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी या पाच नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड २६ नोव्हेंबर रोजी तर कुरखेडा, सिरोंचा, भामरागड व चामोर्शी येथील अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड ३0 नोव्हेंबर रोजी विशेष सभा घेऊन करण्यात येणार आहे. नगर पंचायतीचा निकाल घोषित झाल्यानंतर नागरिकांच्या नजरा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीकडे लागल्या होत्या. निवडणूक विभागाने अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २६ नोव्हेंबर रोजी ज्या नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे, त्या नगर पंचायतीत अध्यक्ष पदासाठी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 ते दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र संबंधित नगर पंचायतीच्या प्रशासकाकडे सादर करता येणार आहे. दुपारी २ नंतर पिठासीन अधिकारी संबंधित नामनिर्देशन पत्रांची छाननी करतील. फेटाळण्यात आलेली नामनिर्देशन पत्रे व फेटाळण्याची कारणो यांच्या सूचना २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्धकरण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी वैधपणे प्राप्त झालेल्या नामनिर्देशित सदस्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन मागे घेता येईल. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन करून अध्यक्षपदाची निवडणूक नगर पंचायतीच्या सभागृहात घेण्यात घेण्यात येईल. एखादा अर्ज प्रलंबित असल्यास उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सुधारीत मुदतीच्या दुसर्या दिवशी निवडणूक घेण्यात येईल.
उपाध्यक्ष पदासाठी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 ते दुपारी १२ वाजेपर्यंत नामनिर्देशन स्वीकारणे त्याच दिवशी अध्यक्षपदाच्या निवडीनंतर लगेच नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशीत उमेदवारांची यादी वाचवून दाखविणे, यादी वाचवून दाखविल्यानंतर १५ मिनिटात नामनिर्देशन मागे घेता येणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर लगेच निवडणूक घेण्यात येणार आहे.
३0 नोव्हेंबर रोजी होणार्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत छाननी केली जाईल व सायंकाळी ५ वाजता उमेदवारी अर्ज फेटाळण्याची कारणे प्रसिद्धकेली जातील. वैध उमेदवारी अर्जांची २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता यादी प्रसिद्धकेली जाईल. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल.
उपाध्यक्षपदासाठी ३0 नोव्हेंबर रोजी १0 ते १२ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारून, वैध नामनिर्देशीत पत्रांची यादी घोषित केली जाईल. १५ मिनीट उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कालावधी दिला जाईल. त्यानंतर लगेच उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येईल.
कोरची नगर पंचायतीत पिठासीन अधिकारी म्हणून देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी डी. जी. नान्हे काम पाहणार आहेत. धानोरा येथे पिठासीन अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. धनकर, मुलचेरा येथे चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, एटापल्ली येथे पिठासीन अधिकारी म्हणून नरेगाचे गटविकास अधिकारी एस. पी. पडघन, अहेरी येथे गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने, कुरखेडा येथे देसाईगंजचे एसडीओ डी. जी. नान्हे, सिरोंचा येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. धनकर, भामरागड येथे बीडीओ एस. पी. पडघन व चामोर्शीचे पिठासीन अधिकारी म्हणून चामोर्शीचे एसडीओ जी. एम. तळपादे काम पाहणार आहेत. सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून संबंधित नगर पंचायतीचे प्रशासक काम पाहणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
0 Comments