
एटापल्ली, ता.१४: शासन कितीही "अच्छे दिन"च्या बाता मारत असले तरी गडचिरोली जिल्हयातील आदिवासी माणूस मात्र नरकयातना भोगत असल्याचे विदारक वास्तव दिसून येत आहे. पोटच्या गोळयाचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन न दिल्याने आई-वडिलांना मृत बालकास चक्क सात किलोमीटर खांद्यावर घेऊन जावे लागल्याची संतापजनक घटना काल(ता.१३) एटापल्ली येथे घडली.
एटापल्ली तालुक्यातील तुमरगुडा येथील तोदे मुरा पोटावी या गरीब आदिवासी इसमाचा संदीप नामक दहा वर्षीय एकुलता एक मुलगा आजारी पडला. मुलाचे प्राण वाचविण्यासाठी मजुरीचे काम सोडून तोदे पोटावी याने संदीपला १२ जानेवारीला एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. परंतु उपचारादरम्यान १३ जानेवारीला संदीपने प्राण सोडला. संदीपची हालचाल बंद होताच तोदे पोटावीने हंबरडा फोडला. तो डॉक्टरांना संदीपचा मृतदेह ताब्यात देण्याची विनंती करु लागला. मात्र डॉक्टरांनी संदीप जिवंत असल्याचे सांगून त्याला आणखी एक दिवस रुग्णालयात ठेवण्याचा सल्ला दिला. मला माझ्या मुलावर उपचार करावयाचे नाहीत, असे तोदे पोटावीने सांगताच डॉक्टरांचा रक्तदाब वाढला. त्याने "मला उपचार करावयाचा नसून होणाऱ्या परिणामास मी स्वत: जबाबदार राहीन", असे तोदेकडून लिहून घेतले. अशिक्षित तोदेला त्यावर अंगठाही उमटविण्यास भाग पाडले. डॉक्टर एवढयावरच थांबले नाहीत, तर त्याला रुग्णवाहिका उपलब्ध करुन न देता त्याला रुग्णालयाबाहेर जाण्यास सांगितले. डॉक्टरांचा अवतार बघून तोदेने अश्रूंना वाट मोकळी करीत संदीपचा मृतदेह स्वत:च नेण्याचा कठोर संकल्प केला. तोदे आणि त्याची पत्नी संदीपला खांद्यावर घेऊन गावाचा रस्ता तुडविण्यासाठी निघाले. चौकात पोहचताच काही संवेदनशील नागरिकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. विचारपूस झाली आणि मोबाईलचे कॅमेरेही त्याच्याकडे सरसावले. तोंदे निघाला तोवर सूर्य क्षितिजापल्याड गेला होता आणि वेदनांना डोक्यात बंदिस्त करुन तोदेचा गावाकडचा प्रवास सुरु झाला होता. एटापल्ली तालुक्यातील या अवस्थेला "अच्छे दिन" म्हणायचे का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
0 Comments